आमची ओळख

तुम्ही इथे आहेत : मुख्यपान / आमची ओळख

आमची ओळख / संकल्पना

सन्माननीय बंधू भगिनींनो !

कोकण ....... आपला कोकण एखाद्या पाश्चात्य देशातील निसर्गरम्य ठिकाणाला लाजवेल असा कोकण, काय नाही कोकणात, संपन्नता, विविधता आणि प्रसन्नता है कोकणाचे आत्मे आहेत. देशात अनेक राज्यातील शेतकरी आत्महत्या करताना दिसतात. राज्यातील काही प्रांतात हि भयानकता आजही कायम आहे पण कोकणात या दुःखाचा लवलेश नाही. याचा अर्थ कोकणात दुःख नाही असा होत नाही. कोकणच्या काही भागात पाचवीला पुजलेले दुःख आहे. पण त्या दुःखातही कोकणी माणूस समाधानी आणि आनंदी असलयाचे दिसून येतो. म्हणूनच 'आल्याचे सुख नाही आणि गेल्याचे दुःख नाही' अशा शब्दात पु. ल. देशपांडे कोकणी माणसाचे मोठे समर्पक वर्णन करतात. अशा या कोकणातील अठरा पगड जातीचे लोक पोटा पाण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या प्रदेशात आले. खरं तर मुंबई ही कोळी बांधवांनंतर कोकणातील माणसाची म्हणावी लागेल . इतका हा कोकणी माणूस मुंबईच्या कानाकोपऱ्यात असलयाचे दिसून येते. जन्मभूमीपासून आपण जेवढे लांब जातो तेवढे एकत्र येण्याची अभिलाषा वाढते. म्हणूनच ३०० ते ४०० मैलांवरून आलेला कोकणी माणूस मुंबई अनेक माध्यमातून एकत्र आला. त्यासाठी त्याने बैठका घेतलया. सुखदुःखात सहभागी होण्याची सवय लावली. त्याचीच पुनरावृत्ती नवी मुंबईत ४० वर्षांपासून सुरु झाली आहे. तेव्हाच्या बेलापूर पट्टीत कोकणातील माणूस येथील आद्योगिक पट्टयात काम करीत होता. त्यामुळे याच ठिकाणी घरकुल शोधण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच नवी मुंबईतील ९५ गावामध्ये असलेलया भाड्याच्या घरात कोकणी माणूस जास्त आहे. त्यानंतर १९७० च्या दशकात 'नवी मुंबई' नावाच्या शहराची वीट रचली गेली. त्यामुळे या शहरातील अलप उत्पन्न घरात राहण्यास येणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यात कोकणी माणूस आघाडीवर होता. नवीन जागेत, नवीन प्रांतात, नवीन वातावरणात गेलेला माणूस हा 'आपली माणसं' शोधत असतो. यातून वाशीतील मराठा संघाची स्थापना झाली. वाशीतील मराठा बांधव एकत्र आले आणि त्यानी चांगली वास्तू निर्माण केली. मात्र नवी मुंबईची भौगोलिक रचना ही एका सरळ रेषेत असलयाने एक उपनगर दुसऱ्या उपनगराशी जोडलेले नाही. त्यामुळे ऐरोलीतील कोकणस्थ मराठी बांधवाना हे ठिकाण दूर वाटत होते. त्यातून १९९१ ला रत्नागिरी मराठी बांधव ही संकलपना घेऊन संघटित होऊ लागले. सुखदुःखात एकत्र येण्यासाठी जवळ आलेले, हे बांधव कधी एका रेशीमगाठीत जोडले गेले ते कळलेच नाही. मग महिलांसाठी हळदीकुंकू ,गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव यासारख्या छोट्या कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. मात्र त्यानंतर संघाला काहीसा ब्रेक लागला.

जगभरातील आर्थिक मंदीचे फटके येथील कारखानदारीला बसू लागले आणि कामगार रस्त्यावर आले. त्यात कोकणस्थ मराठयांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या कामालाही शिथिलता आली. मधला काही काळ असा सुप्तावस्थेत गेल्यानंतर २००५ मध्ये नव्या दमाने, नव्या जोमाने मराठा सेवासंघाने पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. जुन्या संघातील बडे - बजुर्ग मराठा नव्या पिढीतील तरुण तुर्क - मराठा असा संगम सुरु झाला आणि मराठा सेवा संघाची एक हक्काची वास्तू 'मराठा भवन' सेक्टर ५ ऐरोली , मध्ये उभी राहिली. मराठा बांधवाच्या आर्थिक सहकार्याबरोबरच इतर धर्म-जातीतील नेत्यांनी या संघाला सढळ हस्ते मदत केली . संघ त्याचा ऋणी आहे. फुललेला हा निखारा असाच तेजोमय रहावा यासाठी अनेक कार्यकर्त्याचा सहभाग आहे. त्यात वार्षिक स्नेहसंमेलन, वधूवरसूचक केंद्र, वाचनालय, हळदिकुंकू, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असे व अश्या कार्यक्रमांचा सहभाग आहे. याशिवाय संघाच्या नावाचा आणि कार्याचा विस्तार मुंबई-गोवा मार्गावर एक शानदार वृद्धाश्रम अर्थात बांधवाना ते आनंद देणारे 'आनंदाश्रम' याची निर्मिती करण्याचा संघाचा मानस आहे. या सर्व उपक्रमांना आणि संघाला आपलया सहकार्यांची नितांत गरज आहे. या निवेदनातून आपणांस ही एकच नम्र विनंती आहे. धन्यवाद !

आपले विनीत ,

रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ पदाधिकारी व समस्त सभासद